
प्रचारात सहभागी झालेले गिरिश बापट तब्येत खालावल्याने रूग्णालयात दाखल
फडणवीसांचा आग्रह महागात, प्रकृती खालावल्याने चिंता वाढली, विरोधकांची टिका
पुणे दि १७(प्रतिनिधी)- आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. भाजपासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.त्यामुळे भाजपाने कसब्याचे किंगमेकर गिरिश बापट आजारी असतानाही प्रचारात उतरले होते पण आता त्यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे.
कसब्यातुन भाजपाने टिळकांना उमेदवारी न दिल्यामुळे ब्राम्हण समाज नाराज आहे. त्यामुळे भाजपाने आजारी असूनही गिरिश बापट यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.केसरीवाडा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गिरीश बापट यांनी उपस्थिती लावत भाषणही केले होते. पण यानंतर गिरीश बापट यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांना सध्या आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे बापट सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. त्यांनी पत्रक काढून आपण कसब्याच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते पण फडणवीस यांनी विनंती केल्यामुळे ते प्रचारात सहभागी झाले होते. गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण आता त्यांची प्रकृती पाहत ते परत प्रचारात सहभागी शक्यता धुसर आहे. त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या असून विरोधकांनी भाजपावर बापटांना सहभागी केल्याबद्दल जोरदार टिका केली आहे. तर बापट यांची तब्येत खालावल्यामुळे भाजपाची चिंता वाढली असुन मतदार आणखी नाराजी होण्याची भीती भाजपाला सतावत आहे.
गिरिश बापट यांनी गेली २५ वर्ष कसब्यात आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. यंदा ते खासदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांच्या जागी मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या निधनामुळे पोट निवडणुकीत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीने बापट यांनी तब्येतीची भाजपाला फिकीर नसल्यामुळे प्रचारात सहभागी केल्याचा आरोप केला होता.