गाैतमी पाटीलने उशिरा येऊन माझी बदनामी करत फसवणूक केली
गाैतमी पाटीलवर आयोजकांकडूनच गुन्हा दाखल, गाैतमीनेही दिले प्रत्युत्तर, बार्शीत काय घडल?
बार्शी दि १५(प्रतिनिधी) – सबसे कातील गाैतमी पाटील आणि वाद हे समीकरण काही नवे नाही जिथे जिथे गाैतमी पाटील जाते तिथे वाद आणि गोंधळ ठरलेलाच असतो. तरुणाई जरी गाैतमीसाठी गर्दी करत असली तरीही वाद काही गाैतमीची पाठ सोडायला तयार नाहीत. आता ती पुन्हा अडचणीत आली आहे. बार्शी पोलिसात तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या आयोजकांनी तिच्यावर फसवणूक करण्याच्या गुन्हा दाखल केला आहे.
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे गौतमीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची सध्या खूप चर्चा सुरु आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. बार्शीत १२ मे रोजी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटील ७ ऐवजी १० वाजता स्टेजवर आली. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमीने अवांतर पैसे घेतले. तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केली, असं तक्रारदार गायकवाड यांनी तक्रारीत सांगितलं आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिची कोंडी झाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, महावितरण कार्यालयाचे वीजपुरवठा मंजुरीचे प्रमाणपत्र, पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कर्मचारी नियुक्ती प्रमाणपत्र, अग्निशामक यंत्रणेचे व अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय सुविधा प्रमाणपत्र, या सर्व बाबींची पूर्तता केल्यास व पोलिस बंदोबस्त यांचे शुल्क भरल्यानंतर पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असे त्यांना पत्राद्वारे पोलिसांनी कळविले होते. पण यापैकी एकाचीही पूर्तता न केल्याने आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला. दहा वाजता पोलिसांनी कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन शो बंद करण्यास भाग पाडलं. त्यामुळे, बार्शीकरांना गौतमीच्या केवळ एकाच गाण्यावर समाधान मानावे लागले.
मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असे कधी घडलेले नाही. मी वेळेत पोहोचले होते. पण तिथे कार्यक्रमच उशीरा सुरु झाला. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली आहे.