Latest Marathi News
Ganesh J GIF

निकाल कर्नाटकचा लागला, पण धाकधूक वाढली शिंदे गटाची

तो २०१९ चा प्रसंग अन् त्याचा हिशोब २०२३ ला लागला, पण त्या आकड्यांनी शिंदे गटाचा हिरमोड

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. पण या निवडणूकीचा धसका शिंदे गटातील आमदारांनी घेतला आहे. कारण याला २०१९ मधील त्या घटनेची पुनरावृत्ती आपल्यासोबत घडेल अशी भिती त्या आमदारांना वाटू लागली आहे.

कर्नाटकात २०१८ साली झालेल्य़ा निवडणुकीत २२४ पैकी १०४ जागा मिळवल्या. मात्र बहुमताच्या ११३ या आकड्यापासून भाजपा दूर होते. काँग्रेसने या निवडणुकीत ७६, तर जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. इतर अपक्ष आमदारांसह ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर जेडीएस-काँग्रेसने सरकार स्थापन केले. पण २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार पडले आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्या बंडखोर आमदारांनी २०२३ मध्येही निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली होती. या १७ पैकी दोन आमदारांनी निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतला. तर एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा पराभव झाला. बाकीच्या १४ आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यापैकी आठ जणांचा पराभव झाला असून फक्त सहा आमदारांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. म्हणजे नऊ बंडखोर आमदार पराभूत झाले आहेत. त्यामुळे आपलीही अशीच अवस्था होईल का? अशी चिंता शिंदे गटातील आमदारांना सताऊ लागली आहे. या ४० आमदारांपैकी अनेक आमदारांनी निसटता विजय मिळवला होता. दरम्यान ४० मधील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जर हे १६ आमदार अपात्र झाले तर त्यांना निवडणुक लढवता येणार नाही. सध्या हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे.

शिंदे गटावर सातत्याने ५० खोके एकदम ओके असा आरोप केला जातो. त्याचबरोबर या आमदारांना अनेकवेळा जनतेकडून होणाऱ्या घोषणाबाजीचाही सामना करावा लागला आहे. त्यामुळे याचा परिणाम २०२४ सालच्या विधानसभेत दिसणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार चिंतेत आहेत. एकंदरीत आगामी विधानसभेत शिंदे गट आपापले गड राखणार की पराभूत होणारे? नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!