
पुण्यात मुलींच्या टोळक्याची दिव्यांग मुलीला बेदम मारहाण
"राडा.. कंपनी..गँगस्टर.." नावाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, प्रसिद्धीचा हव्यास
पुणे दि १९(प्रतिनिधी)- चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे, ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मुलींच्या हाणामारीची समोर आलेली घटना पुण्याची आहे. एका चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवत केसांना धरुन ओढत नेत मारहाण केली. विशेष म्हणजे या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकत “राडा.. कंपनी..गँगस्टर..” असे कॅप्शन त्याला देण्यात आले होते. वडीलांनी इन्स्टावर आपल्या मुलीला मारहाण होत असल्याचा व्हीडीओ पाहिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी शाळेत भेट घेवून मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मारहाण करणाऱ्या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे, समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे यासाठी त्या असे स्टंट करत असतात. इन्स्टावर व्हीडीओ टाकून फेमस होण्याचा त्यांचा हेतू होता. दरम्यान पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून त्या मुलींना सोडून दिले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. स्वत: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. पण पुण्यातील या मुलींने केलेले कृत्य धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.