हडपसरमध्ये पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला
हडपसर पोलिसात गुन्हा दाखल, हल्ल्यात तरुण जखमी, विवाहित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशन प्रकरण?
पुणे दि १७(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीसोबत एक तरुण लिव्ह इनमध्ये राहत असल्याने संतापलेल्या पतीने एकाने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. यासंदर्भात हडपसर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.
अमोल संदिपान गायकवाड विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर सुशांत बाळासाहेब चव्हाण या तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल संदिपान गायकवाड याची पत्नी सुशांत चव्हाण या तरुणासोबत मागच्या दीड वर्षांपासून ससाणे नगर येथील ओम साई व्हिडिओ गेम अँड पोकर झोन परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. याचा अमोल गायकवाडला राग होता. या रागातून तो शनिवारी काळेपडळला आला. त्याने ओळख पटू नये, म्हणून तोंडाला रुमाल बांधून डोक्यावर टोपी घातली होती. तर चव्हाण हा दुकानात होता. त्यावेळी अचानक गायकवाडने हातातल्या हत्याराने सुशांतच्या डोके, कान आणि हातावर वार केले. यामध्ये सुशांत गंभीर जखमी झाला आहे.
या हल्ल्यानंतर सुशांतने अमोल गायकवाड विरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत. एकंदरीत दुसऱ्याच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे चांगलेच महागात पडले आहे.