Latest Marathi News
Ganesh J GIF

पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक, सभागृहाचे कामकाज तहकूब

विरोधकांचा सभात्याग, ट्रिपल सरकारची कोंडी, शरद पवार गटाचे आमदार मात्र गायब, जोरदार चर्चा

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधक कुठे आहेत असा प्रश्न सत्ताधारी गटाकडून उपस्थित करण्यात आला होता. पण विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळातदेखील विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे गटाचे देखील आमदार उपस्थित होते. पण शरद पवार यांचा गट मात्र उपस्थित नव्हता. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली होती. पण त्यांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. यावर उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र या उत्तरावर समाधानी न झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्‍यात आले. सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सरकारच्या नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. यानंतर काही अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. पण विरोधकांच्या गोंधळामुळे फक्त संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधानभवनात काँग्रेस. पक्ष चांगलाच आक्रमक झाला होता. त्यामुळे काँग्रेसचा कोणता नेता विरोधी पक्षनेता होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण आज विरोधकांच्या घोषणाबाजीवेळी शरद पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांपैकी एकही तिथे उपस्थित नव्हता, त्यामुळे याची जोरदार चर्चा होत आहे.

संख्याबळ घटले असले तरी विरोधक माघार घेणार नाहीत, असे स्पष्ट करीत विरोधकांनी आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. पावसाने दिलेली ओढ, दुबार पेरण्यांचे संकट, कृषी क्षेत्रावरील संकट यामुळे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहेत. अधिवेशनात आगामी काळात जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!