
राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार?
हसन मुश्रीफ यांना मोठा झटका, कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मोठा निर्णय
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी ईडी तपास करत आहे. काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना पुढील दोन आठवडे मुश्रीफ यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले होते.सत्र न्यायालयाने मुश्रीफ यांना आतापर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र, मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान आता मुश्रीफ या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार का, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. ईडीने त्यांना मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देखील बजावले होते. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना अटक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता हायकोर्टात या निकालाला आव्हान देण्याकरता मुश्रीफ यांच्या वकिलांनी दोन आठवड्यांचा अवधी मागितला आहे.
मुश्रीफ यांच्याकडून आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. आमदार हसन मुश्रीफ यांना अटकेपासून तीन दिवसांचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.