
हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंना पुणे पोलीसांकडून अटक
जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण, ग्रामस्थांच्या मोर्चानंतर पोलिसांची कारवाई
पुणे दि ३(प्रतिनिधी)- हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह त्यांच्या साथीदारांना पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मुळशी तालुक्यात देसाई आणि साथीदारांनी दहशत माजविली आहे, त्याचबरोबर जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकरी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी ही अटक कारवाई करण्यात आली आहे.
दारवली ग्रामस्थांनी देसाईविरुद्ध कारवाई करण्यासाठी पौड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. मिळालेल्या माहितीनुसार पौड परिसरातील दारवली गावात बलकवडे कुटुंबीय राहायला आहे. सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले असता देसाईचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले. जमीन नावावर करुन न दिल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी दिली. बलकवडे यांना श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. त्याचबरोबर देसाई यांनी पौड भागात अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. तसेच गोशाळेच्या नावाखाली पाळीव जनावरे शेतात सोडून दिली जातात. विशेष म्हणजे धनंजय देसाई हे हिंदू राष्ट्र सेना चालवतात. पण, धनंजय देसाई यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. धनंजय देसाई हे संघटनेच्या नावाखाली समाजात जातीय तेढ निर्माण करतात. असाही आरोप करण्यात आला आहे. पोलीसांनी याप्रकरणी देसाई याच्यासह रमेश जायभाय, श्याम सावंत, रोहित यांच्यासह १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.तेच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह त्याच्या साथीदारांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने देसाई याच्यासह अटकेत असलेल्या सहाही जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील निलेश लडकत यांनी बाजू मांडली. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे त्याचे स्वरूप पाहून न्यायालयाने देसाई याला ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.