Latest Marathi News

हाॅटेल मालकाची शटर बंद करत पोलिसांना बेदम मारहाण

नवी मुंबईतील कोपरखैरणेतील प्रकार, जेवायला गेले आणि...

मुंबई दि १८(प्रतिनिधी) – मटणाचा रस्सा चांगला नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.

कोपरखैरणे पोलिस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे आणि त्यांच्या दोन सहका-यांसोबत ही घटना घडली आहे. गुरुवारी ते कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांना वाढलेल्या रश्याला चव नसल्याची तक्रार केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना खायचे असेल तर खा नाही तर नका खाऊ नका, असे उलट उत्तर दिले. पोलिसांनी त्याला अशा प्रकारे उद्धट बोलण्याचा जाब विचारला. यावरून हॉटेल कर्मचारी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून पोलिसांना डांबत मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालक अक्षय जाधव आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कायद्याच्या रक्षकांबरोबरच अशी घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ले होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असे सामान्यांचे मत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!