
नाशिक दि ५(प्रतिनिधी)- अलीकडे रोज कुठे ना कुठे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अग्नि तांडव पहायला मिळाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. बोगीला आग लागल्यामुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळाले.सुदैवाने, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हेड वायर तुटल्याने प्लॅटफॉर्म ३ वरील वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक प्लॅटफॉर्म १ व २ वर वळवण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई कडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे.
नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. दोन दिवसांआधीच आगीची आणखी एक घटना समोर आली होती. यात एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागली होती. तर एकदा बसला लागलेल्या १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.