
जिवंतपणी मदत नाही झाली, आता मी मेल्यावर तरी मदत करा
भाजपा सरकारवर टीकेचा व्हिडिओ बनवत शेतक-याची आत्महत्या, म्हणाले या सरकारकडून आता....
अहिल्यानगर – महाराष्ट्रात काल बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पण त्याच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक बातमी राज्य सरकारनेच दिली आहे. पण उपाययोजना होत नसल्याने आणखी एक शेतक-याने विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या अहिल्यानगर मधील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी त्यांनी एक व्हिडिओ तयार करत त्यांच्या अडचणीचा उल्लेख करताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. बाबासाहेब सरोदे यांनी रविवारी विषारी औषध घेतले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी काढून ठेवलेला व्हिडिओ समोर आला. यात त्यांनी कर्जबाजारीपणा कंटाळून मृत्यूला कवटाळत असल्याचे म्हटले आहे. तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, असा आरोप करताना, त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी रचलेल्या रचनेतील ‘धनवंतानी पिळले, धर्मांधांनी छळले, चोर झाले साव’ या ओळींची आठवण करून दिली आहे. बाबासाहेब सरोदे यांनी व्हिडिओमध्ये, ‘मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर आजपर्यंत जीवंत होतो, कर्जमाफी होऊन मी कर्जमुक्त होईल, या आशेवर मी जगत होतो. दोनदा भाजप सरकार आले, देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले, त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. माझी आज आशा संपलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगून गेले, धर्मांधाने अधिक पिळले, धनवंताने अधिक छळले, क्रुर झाले साव… तसं हे सरकार झालेले आहे, योग्य वेळी मला सरकारकरडून मदत झाली असती तर नक्कीच मी माझे आयुष्य जगलो असतो. पण, आता माझा आत्मविश्वास संपला आहे. कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. फडणवीस साहेब, आपले अस्तित्व सिध्द करायचे असेल तर जिवंत माणसाला तर मरावे लागत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. या जिवंत जगात जगायचे असेल तर पैशाशिवाय दुसरे काहीही लागत नाही. जिवंतपणी मला मदत नाही झाली, आता मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबाला आणि कोणी कर्जबाजारी शेतकरी बांधव असतील तर त्यांना मदत करा, अशी भावनिक साद त्यांनी शेतकरी आणि नागरिकांना घातली आहे.
बाबासाहेब सुभाष सरोदे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. ते कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. या घटनेमुळे गावकरी देखील आक्रमक झाले असून अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट बघत आहे, असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.