
शरद पवार अन् जयंत पाटलांना भेटायची हिंमत नाही…”; सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे भावूक
महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक राजकीय बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (३० मे) अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.

आज दुपारी ३ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून मतदारसंघात त्यांचे बॅनर्सही झळकू लागले आहेत.मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे कमालीचे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “माझे मामा जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार यांना भेटण्याची माझ्यात हिंमत नाही,” अशी थेट कबुली त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पक्ष सोडण्यापूर्वी घेतली सुप्रिया सुळेंची भेट!

भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काल, शुक्रवारी (२९ मे) प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीदरम्यान तनपुरे यांनी आपण पक्ष का सोडत आहोत, याची कारणे सुप्रिया सुळे यांना सांगितली. तसेच आजवर पक्षाने दिलेल्या संधींबद्दल आणि मंत्रिपदाबद्दल त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे आभार मानले.
“मामा आणि पवार साहेबांना सांगायची हिंमत नाही” – प्राजक्त तनपुरे
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्राजक्त तनपुरे अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले, “आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय. पण माझे मामा जयंत पाटील यांना भेटायची हिंमत माझ्यात नाही, त्यांना मी याबद्दल सांगितलेलं देखील नाही. तसेच शरद पवार यांनादेखील सामोरं जाण्याची माझ्यात हिंमत नाही. माझ्याकडे आता शब्द उरलेले नाहीत, त्यामुळे बोलणेही अवघड झाले आहे.”
पक्ष बदलण्याच्या कारणावर बोलताना ते म्हणाले, “मी हा निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी घेत नसून मतदारसंघातील अडचणी पाहून घेत आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी आजपर्यंत संघर्ष केला, त्यांच्या भावनांचा मला विचार करावा लागेल. मला माझ्या कार्यकर्त्यांचं राजकारण आणि भविष्यही बघायचं आहे.”
‘त्या’ ऐतिहासिक प्रसंगाची करून दिली आठवण
यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या बंडावेळची आठवण करून दिली. “खरंतर अजित पवार जेव्हा भाजपसोबत जात होते, तेव्हा राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एका पत्रावर सह्या केल्या होत्या. पण मी त्या पत्रावर सही न करता बैठकीतून बाहेर पडणारा पहिला आमदार होतो,” असे सांगत आपण नेहमीच पक्षाशी प्रामाणिक राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धर्मनिरपेक्ष मतांशी प्रतारणा का? तनपुरेंनी दिले उत्तर
“तुम्ही धर्मनिरपेक्ष मतांशी प्रतारणा करताय, ज्यांनी मंत्रिपद दिले त्यांचीच साथ सोडताय,” असा थेट सवाल पत्रकारांनी विचारला असता तनपुरे म्हणाले, “मी कायम पक्षनिष्ठ राहिलो आणि सत्तेविरोधात लढलो. मला सत्तेसाठी अनेकदा संधी मिळाल्या हे खरं आहे, पण आज परिस्थिती वेगळी आहे. ज्यांच्या जीवावर मी संघर्ष करतोय, त्या कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊनच मी हा जड अंतःकरणाने निर्णय घेतला आहे.” प्राजक्त तनपुरे यांच्या या मोठ्या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा सुरुंग लागला असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे.

