ठरल तर! सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर या तारखेला चर्चा
विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत होणार चर्चा, या तारखेला मोदींची विश्वास परिक्षा
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- मणिपूरप्रश्नी केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत चर्चा होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला १० ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग देखील फुंकले जाणार आहे.
संसदेत २६ जुलै रोजी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी विरोधी पक्षांच्या वतीने अविश्वास ठराव मांडला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अविश्वास प्रस्तावाला ५० खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळाल्यानंतर तो स्वीकारला. त्यानंतर सर्व पक्षांशी चर्चा करून अविश्वास प्रस्तावावर चर्चेची तारीख जाहीर केली जाईल, असे सभापतींनी सांगितले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी मणिपूरला दोन दिवसीय भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि अनेक कुकी आणि मैतेई प्रदेशातील मदत शिबिरांनाही भेट दिली होती. मेपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर निवेदन द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती. पण मोदी उत्तर देत नसल्यामुळे विरोधकांनी अविश्वास ठराव आणला होता. अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये मणिपूर हिंसाचारावर सतत गोंधळ होत आहे. सरकारने या घटनेवर नियम २६७ अन्वये चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी आहे. तर सरकार या घटनेवर नियम १७६ अंतर्गत चर्चा करण्यास तयार आहे.
२०१४ नंतर मोदी सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची ही दुसरी वेळ आहे. २० जुलै २०१८ रोजी लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३२५ खासदारांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आणि केवळ १२६ सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला होता.