Latest Marathi News
Ganesh J GIF

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मराठी हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोदी, ठाकरेंसोबत केले काम, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

मुंबई दि २(प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील स्वत: एन. डी. स्टुडीओमध्ये देसाईंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आढळला आहे. नितीन देसाई यांचे नाव चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य कला दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ उभा केला होता. ज्याद्वारे अनेक सिनेमांचे  चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी अनेक वेळा सेट उभारले होते. मोदींची कमळातून एंट्रीची संकल्पना देसाई यांनाच सुचली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांनी अवघ्या २० तासांच मंच उभारला होता. मुंबईतील शिवाजी पार्कात हा भव्य मंच उभारण्यात आला होता. नितीन देसाई यांनी ८०च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या हटक्या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. परिंदा, हम दिल दे चुके सनम, देवदास, हरिश्च्ंद्राची फॅक्टरी सारख्या अनेक भव्य चित्रपटांचे कला दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले होते. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००५ मध्ये देसाई यांनी मुंबईजवळील कर्जत येथे ५२ एकर मध्ये एनडी स्टुडिओ उघडला होता. गेल्या ३० वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली होती. नितीन देसाई यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे सांगत स्वतःच्या व्यथेला वाट मोकळी करुन दिली होती. स्टुडिओ चालत नसल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज वर्तवला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!