Latest Marathi News
Ganesh J GIF

गुदमरल्यासारखं वाटतंय तर ‘मातोश्री’वर या; सत्तारांच्या मनातील खदखद आणि राऊतांची ‘घरवापसी’ची ऑफर

राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट भाजपवर मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. सत्तार यांच्या मुलाने विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केल्याने आधीच तणाव वाढला असताना, आता या वादात शिवसेना ठाकरे गटाने मोठी उडी घेतली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर अत्यंत खळबळजनक वक्तव्य करत शिंदे गटातील नेत्यांना थेट ‘मातोश्री’वर येण्याची खुली ऑफर दिली आहे.

भाजप म्हणजे ‘स्लो पॉयझन’; राऊतांचा दावा

अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “हे अब्दुल सत्तारांचे वैयक्तिक मत असू शकते. कदाचित त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असावा.” पुढे बोलताना त्यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर थेट बोट ठेवले. “शिंदे गटातील काही नेते तर भाजपला ‘स्लो पॉयझन’ (हळूहळू मरणारं विष) देखील म्हणत असल्याची माहिती मला मिळाली आहे,” असा खळबळजनक दावा राऊतांनी केला. भाजप आपल्याच मित्रपक्षांना हळूहळू संपवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

त्यांनी ‘मातोश्री’वर यावं, पण ‘या’ नेत्यांना नो एन्ट्री!

संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांना आणि नेत्यांना घरवापसीचे स्पष्ट संकेत दिले. राऊत म्हणाले, “जर कोणाला महायुतीत गुदमरल्यासारखे वाटत असेल आणि भाजप हे ‘स्लो पॉयझन’ आहे अशी खात्री पटली असेल, तर त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली यावे, म्हणजेच ‘मातोश्री’वर यावे.मात्र, ही ऑफर देताना त्यांनी एक मोठी अटही घातली. “काही विशिष्ट आणि कट्टर गद्दार नेत्यांना आमच्या पक्षात पुन्हा येण्यास कायमचा मज्जाव असेल हे मात्र नक्की,” असे सांगत त्यांनी गद्दारी करणाऱ्या प्रमुख नेत्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद असल्याचे स्पष्ट केले.दुसरीकडे, अब्दुल सत्तारांच्या जाहीर आरोपानंतर महायुतीत तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रमुख नेत्यांनी सत्तार यांना तातडीने बैठकीसाठी पाचारण केले असून, एकीकडे त्यांची मनधरणी आणि दुसरीकडे या बंडखोरीची चौकशी करण्याचे नाट्य सुरू झाले आहे.

राजकीय वातावरण तापले!

अब्दुल सत्तारांच्या मनातील खदखद बाहेर आल्यामुळे महायुतीमधील जागावाटप आणि अंतर्गत समन्वय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, संजय राऊतांच्या या ‘स्लो पॉयझन’ आणि ‘घरवापसी’च्या ऑफरमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आता शिंदे गटातील कोणते नेते यावर पलटवार करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!