आयपीएलमधील ‘या’ संघात दोन महिलांवर महत्वाची जबाबदारी
सर्वात महागड्या खेळाडूवर महत्वाची जबाबदारी, ही स्टार खेळाडू होणार संघाची मेंटाॅर
बेंगलोर दि १८(प्रतिनिधी)- प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात RCB ने मराठमोळी डावखुरी फलंदाज स्मृती मंधानावर ३ कोटी ४० लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात दाखल करुन घेतले होते. आता तिच्यावर एक अतिशय महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाची कर्णधार बनली आहे. आरसीबी पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी शनिवारी एका खास पद्धतीने याची घोषणा केली. आरसीबीने इन्स्टाग्रामवर कोहली आणि प्लेसीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांनी आरसीबीच्या महिला संघाच्या पहिल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.कोहली म्हणाला की, “आता आणखी 18 व्या क्रमांकाची वेळ आली आहे, जो महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीच्या अतिशय खास संघाचे नेतृत्व करणार आहे आणि हे नाव आहे स्मृती मंधाना” यावेळी कोहलीने मंधानाला शुभेच्छा देत तिला पूर्ण पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.स्मृतीला आधीच कर्णधारपदाचा अनुभव आहे. तिने ११ टी २० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये भारताने ६ टी २० सामने जिंकले आहेत आणि ५ सामने गमावले आहेत.
टेनिस स्टार सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याला दुजोरा दिला आहे. टेनिसमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सानिया मिर्झा आता क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आरसीबी संघाशी जोडलं गेल्याने मला आनंद झाला आहे. अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झाने दिली आहे.