पुणे मनपाचे वारकरी महिलांकरीता आरोग्यवारीचे उद्घाटन
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळ्यात मिळणार सेवा
पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संकल्पना असलेल्या ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आणि त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या मदतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
या आरोग्य वारीमध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
1. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली आहे.
2. मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
3. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
4. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा कालावधीमध्ये दोन्ही पालख्यांचा दिनांक १२/०६/२०२३ ते १४/०६/२०२३ पर्यंत पुणे शहरात मुक्काम असणार आहे. या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने मुक्कामाच्या निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी महिला वारकऱ्यांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी वेंडिंग मशीन बसविण्यात आले आहेत.
निवडुंग्या विठोबा मंदिर या ठिकाणी दिनांक १०/०६/२०२३ रोजी आरोग्य वारीच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम स.१०.३० ते ११.३० या वेळेत मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा, मा.श्री.रवींद्र धंगेकर, विधानसभा सदस्य, २१५ कसबा विधानसभा व राज्य महिला आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळी श्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री मितेश गट्टे,रविंद्र बिनवडे, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज),जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे, श्रीमती आशा राऊत उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, मा.श्रद्धा जोशी शर्मा, मा.दीपा ठाकूर, राज्य महिला आयोग सदस्य श्री आबा पांडे, श्रीमती संगीता श्रीमती गौरी छाब्रिया , राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख श्री प्रशांत जगताप , उपायुक्त श्री अविनाश सकपाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती अस्मिता तांबे, स्थानिक सभासद मा. नंदाताई लोणकर, मा. वनराज आंदेकर, मा. अर्चना पाटील, मा. विशाल धनवडे ,मा.रविंद्र माळवतकर इ. मान्यवार उपस्थित होते.
त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आलेल्या शहरातील विविध शाळांमध्ये देखील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याठिकाणी महिला कक्ष स्थापन करण्यात आला असून महिला स्त्री रोगतज्ञ व औषध सामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा व आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
या आरोग्य वारीमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून यामध्ये महिला आरोग्य व सुरक्षा विषयक सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे जिल्हा यांनी चाकणकरांचे विशेष अभिनंदन केले व या ऐतिहासिक वारीचा शुभारंभ होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता स्वच्छ संस्था, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिटिव्ह, जाणीव संस्था व इतर स्वयंसेवी संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
पुणे महानगरपालिकेमार्फत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून अभिनंदन करण्यात आले. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे असं म्हणता येईल.