आयपीएल चाहत्यांमध्ये मैदानातच तुफान हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल, क्रिकेट मैदान बनले चक्क कुस्तीचा आखाडा
दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- आयपीएल आपल्या उत्कठंवर्धक अवस्थेत आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच सामन्यांमध्ये स्टेडियम खचाखच भरलेले पहायला मिळाले आहे. आयपीएलमधील चाहते देखील आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर आहेत. पण सनरायझर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामन्यात चाहते बेभान झालेले पहायला मिळाले.
आयपीएल २०२३ मध्ये २९ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणारा सामना सध्या खूप चर्चेत आहे. कारण यावेळी आपल्या संघाला प्रोत्साहन देताना चाहत्यांमध्ये हाणामारी झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही प्रेक्षक एकमेकांनी मारत असल्याचं दिसत आहे. अगदी लाथा-बुक्यांची तुंबळ हाणामारी झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये काही फॅन्सच्या हातात दिल्ली कॅपिटल्स संघाचा झेंडा दिसत आहे. पाच ते सात जण एकमेकांना लोळवून आणि केस धरून मारहण करताना दिसत आहेत. या मारहाणीचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडीओ जोरदार चर्चेत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
A fight took place between fans in Delhi during their match against SRH. pic.twitter.com/MYPj6dqejb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने त्याला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबाद संघाने दिल्लीविरुद्ध सलग पाच पराभवांचा क्रम खंडित केला आहे. दिल्ली गुणतालिकेत सध्या तळाला म्हणजे दहाव्या स्थानी आहे.