राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातही भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रणजित सिंह निंबाळकर यांच्याविरोधात धैर्यशिल मोहिते पाटील यांना मोठी आघाडी मिळाली आहे.भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा दिलेली उमेदवारी. निंबाळकरांच्या उमेदवारीने पसरलेली नाराजी हेरत शरद पवार यांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांना दिलेल्या उमेदवारीमुळे माढ्यात राजकीय राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाची तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या मोहिते पाटील यांना उत्तम जानकर, फलटणचे निंबाळकर यांचीही साथ मिळाली.
त्यामुळेच माढ्यामध्ये धैर्यशिल मोहिते पाटील यांचे पारडे सुरूवातीपासून जड होत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी ताकद लावली होती. शरद पवार यांच्या प्रत्येक डावपेचाला शह देण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र मोहिते पाटील यांना डावलण्याची मोठी किंमत भारतीय जनता पक्षाला मोजावी लागली. दुसरीकडे निंबाळकर निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील विरोधी नेत्यांची मोट बांधली होती. यामध्ये आमदार संजय शिंदे, बबन शिंदे, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील यांचा समावेश होता. त्यामुळेच निंबाळकर यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट दिल्याने मोहिते पाटील घराणं भाजपवर नाराज झालं होतं.
पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. 2008 मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली. तेव्हा पहिल्यांदा शरद पवार इथून निवडून आले होते. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. साताऱ्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील 42 गावेही माढा लोकसभा मतदारसंघाला जोडली आहेत.भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्यात लढत झाली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे, बसपकडून आप्पा लोकरे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तेव्हा रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस, माण, फलटण आणि सांगोल्यातून संजय शिंदेंपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं.