Latest Marathi News
Ganesh J GIF

तुमच्या ताटातील पनीर शुद्ध आहे का? पुण्यात १७ ठिकाणी एफडीएचे छापे; कोट्यवधींचा माल जप्त

सणासुदीच्या काळात किंवा हॉटेलमध्ये पनीर, खवा खाताना आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील १७ विविध ठिकाणांवर छापे टाकून भेसळीचा संशय असलेला तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात कुठे झाली कारवाई?

एफडीएच्या पथकाने सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ या मध्यवर्ती भागांसह कोथरूड आणि हडपसर परिसरातील दुकानांवर धाडी टाकल्या. यामध्ये पनीर, खवा, चीज आणि तुपाचे एकूण ३५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेला साठा:

पनीर: २,८०६ किलो

खवा: १३,१२७ किलो

तुप: ९६० किलो

चीज ॲनालॉग: १३८ किलो

सातारा जिल्ह्यातही धडक कारवाई

पुण्यासोबतच सातारा जिल्ह्यातील माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्येही एफडीएने कारवाईचा बडा बगा उचलला आहे. येथे तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर छापे टाकून सुमारे २ लाख ३८ हजार रुपयांचा माल जप्त केला असून ४ नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

राज्यभरात गुटखा आणि पानमसाल्याविरुद्ध युद्ध

अन्न व औषध प्रशासनाने १ ते ५ जून दरम्यान राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात मोठी मोहीम राबवली.
एकूण छापे: १९५ ठिकाणे
अटक: १९२ आरोपींना बेड्या
जप्त माल: १ कोटी ९९ लाख १८ हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा

प्रमुख कारवाया

१. धाराशिव (परांडा): १ कोटी २ लाख ६७ हजार रुपयांचा माल जप्त.
२. समृद्धी महामार्ग (सावंगी टोल): ६० लाख ५० हजार रुपयांचा माल आणि वाहने जप्त.
३. धुळे: २३ लाख ५० हजार रुपयांचा माल ताब्यात.

कडक कायदेशीर कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांची आता खैर नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!