
जरांगेचा गणेशोत्सवात मुंबईत दंगल घडवून आणायचा प्रोग्राम
या नेत्याची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका, फडणवीस आणि सरकारला दिला 'हा' इशारा
मुंबई – ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणारे लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, अशी बोचरी टीका हाके यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. हाके म्हणाले, बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत. जरांगे पाटील यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे. याच दरम्यान गणेशोत्सवात मुंबईला जायचं आणि दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांचा आहे. जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या. पण महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे पाटील यांना करायचा तो प्रयत्न रोखावा, अशी मागणी हाके यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. मनोज जरांगेंची भाषा चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबलं पाहिजे. बेकायदेशीर मागणी करत असताना त्यांचे लाड का केले जातात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जरांगे पाटील यांनी कितीही माणसं गोळा करू देत. आम्ही सर्व शांतपणे पहात आहोत. मात्र, लवकरच संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाची ताकद सर्वांनाच दाखवून देऊ, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.
शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत. ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात. जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारे त्याचे आंदोलन उभं करणारे अशी शरद पवार यांची ओळख आहे. आज तेच ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा सुरू करत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.