
जयंतराव, तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं ते सांग
गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका, फडणवीस यांनी समज देऊनही खालच्या स्तरावर टीका
सांगली – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय खालच्या शब्दांत टीका केला आहे. ते आरेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलत असताना पाटील यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्यानंतर देखील पडळकर यांनी ही टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर हे सातत्याने जयंत पाटील यांच्या खालच्या शब्दात टीका करत आहेत. आज पुन्हा पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मला मंगळसूत्र चोर म्हणतात, जयंत पाटील यांनी सांगावं त्याच्या कितव्या बायकोचे मी मंगळसूत्र चोरले अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सांगलीत यांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा घेतली आणि मला आई-बहिणींवरुन शिव्या दिल्या. मला गोप्या म्हटले पण याची कुठे चर्चा झाली का? चाळीस हजाराच्या फरकाने निवडून दिलेल्या विधानसभेच्या आमदाराला हे शिव्या देताहेत. मला गोप्या म्हटले तर फरक पडणार नाही कारण मी सामान्य घरातील मुलगा आहे, पण तुला जंत्या म्हटले तर चालेल का असा एकेरी उल्लेख ही आमदार पडळकर यांनी केला. “अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे. माझे हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीत केली. ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की, त्याला पोर हुडकायला चालले. त्या जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आव्हान करतोय. तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी पत्रकार परिषद घेऊन जयंत्या पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल”, असं चॅलेंज गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे. विरोधकांकडून नेहमी पडळकरांवर टीका करताना मंगळसूत्र चोर म्हणून टीका केली जाते. यावरुन संतापलेल्या गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना खोचक सवाल केला आहे.
काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विधानावरून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली होती. वादग्रस्त विधाने करणे टाळावी, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकर यांना ताकीद दिली होती. तरीही पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.