लग्नास नकार दिल्याने विवाहित महिलेकडून तरुणाचे अपहरण
पुण्यात गुन्हेगारी थांबता थांबेना, तरुणाचे अपहरण करत गुजरात गाठला, पण त्या गोष्टीमुळे प्लॅन फसला
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली आहे. विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील कोंढवे धावडे परिसरात ही घटना घडली होती. पुणे पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार मूळ सोलापूरचा असलेला २३ वर्षीय तरुण पुण्यात एनडीए रस्ता परिसरात राहायला होता. त्यावेळी त्याचे तिथे राहणाऱ्या २८ वर्षाच्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. पण त्या तरूणाच्या घरच्यानी त्याचे लग्न दुसरीकडे ठरवले आणि त्याला सोलापूरला बोलावून घेतले. त्यामुळे नोकरी सोडून तो सोलापूरला निघून गेला. प्रेमसंबंध तोडल्याने विवाहित महिला चांगलीच संतापली. आणि तिने त्या तरूणाच्या अपहरणाचा कट रचला. यासाठी तिने सराईत गुन्हेगारांना याची सुपारी दिली. चार दिवसापूर्वी त्या महिलेने अपहरणकर्त्यांसोबत त्या तरुणाचे अपहरण करुन, गुजरातमधील वापी या ठिकाणी घेऊन गेले. उत्तमनगर पोलिसात याची तक्रार झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली होती. तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसून आल्यानंतर पोलीसांनी पुढील माग काढत गुजरातमधील वापी येथील हाॅटेलवर छापा टाकत तरुणाची सुटका केली.
सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली. पोलीसांनी महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक केली आहे. पण यामुळे पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलीसांसमोर निर्माण झाले आहे.