पोलीसांनी धिंड काढूनही पुण्यात कोयते गँगची दहशत कायम
नागरिक व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण, गँगला रोखताना पोलीस मेटाकुटीला
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. उलट कोयता गँगचे लोण वाढतच चालले आहे. आता तर मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन मुलांकडून कोयते फिरवत दहशत माजावण्याचे प्रकार घडला आहे. मुलांनी कोयता आणि तलवारी चा वापर करत गाड्यांची तोडफोड केली आहे. आंबेडकर नगर परिसरात ही तोडफोड करण्यात आल्याने नागरिक धास्तावले आहेत.
पुण्यातील मार्केट यार्ड भागात असणाऱ्या आंबेडकर नगर येथील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवत लोकांना दुकाने बंद करायला सांगितली. एवढ्यावर न थांबता त्यांनी धुडगूस घालत दुचाकी गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. यानंतर सर्व आरोपी हातात कोयते आणि तलवारी नाचवत त्या ठिकाणाहून पसार झाले. महत्वाचे म्हणजे या गँगमध्ये सर्व तरुण हे अल्पवयीन होते. त्यामुळे आगामी काळात तो एक गंभीर चिंतेचा विषय बनन्याची शक्यता आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले. पण कोयता गँगची वाढती दहशत पूर्णपणे रोखण्याचे पोलीसांसमोरील आव्हान असणार आहे. पुण्यात दहशत माजवण्याचे प्रकार थांबत नसल्याने स्थानिक दुकानदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घालून पुणेकरांना जेरीस आणले आहे. त्यांच्या दहशतीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. पण अजूनही त्यांना रोखणे पोलिसांना शक्य झालेले नाही. पोलीसांकडुन त्यांची धिंड काढूनही कोयता गँगची मुजोरी वाढतच असल्याचे दिसत आहे.