Latest Marathi News
Ganesh J GIF

बाळू धानोरकरांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

सोनिया गांधीचा शोक संदेश, धानोरकरांच्या निधनाने काँग्रेस कुटुंबाची मोठी हानी-मल्लिकार्जून खर्गे

चंद्रपूर दि ३१(प्रतिनिधी)- काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. बाळू धानोकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यस्कार करण्यात आले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचा शोकसंदेश घेऊन सहप्रभारी आशिष दुआ आले होते तर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच राहुल गांधी यांच्यावतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “बाळू धानोरकर यांना मी फार पूर्वीपासून ओळखतो. ते अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक व्यक्ती होते. पती आणि कुटुंबातील सदस्य गमावणे नेहमीच दुःखदायक असते, अशा अकाली निधनाला सामोरे जाणे अत्यंत कठीण असते. धानोरकर यांच्या निधनाने फक्त चंद्रपूरचीच हानी झालेली नाही तर काँग्रेस कुटुंबाचीही मोठी हानी झाली आहे”. सोनिया गांधी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “ पतीचे अकाली निधन तुमच्या कुटुंबावर विशेषतः तुमच्यासाठी मोठा आघात आहे. नियतीपुढे आपले काही चालत नाही, वास्तव आपल्याला स्विकारावे लागते.मला विश्वास आहे की तुम्ही या कठीण प्रसंगाला मोठ्या धैर्याने तोंड द्याल. काँग्रेस पक्षाचे खासदार या नात्याने ते जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडत असत, त्यांच्या अकाली निधनाने मोठी हानी झाली आहे”. खासदार बाळू धानोरकरांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, “बाळू धानोरकर यांचे निधन आमच्यासाठी तसेच विदर्भासाठी मोठा धक्का आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी यापद्धतीने त्यांचे अकाली निधन व्हावे ही मनाला चटका लावून जाणारी घडना आहे. एका लोकनेत्याचे असे अकाली जाणे मनापासून दुःखद आहे. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.”.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारीही तसेच राज्यातील विविध पक्षांचे नेते व लोकप्रितिनिधी व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!