कल्याणच्या मानवी वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ
घटनेचा व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडून पकडण्यासाठी प्रयत्न सुरु
कल्याण दि २४(प्रतिनिधी)- कल्याणमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागात एका इमारतीत बिबट्या शिरला होता. श्रीराम अनुग्रह टॉवर नावाच्या इमारतीत आज पहाटे अचानक बिबट्या शिरला त्याने त्या इमारतीत ठाण मांडल्याने नागरिकांची गाळण उडाली होती.
बिबट्याने आतापर्यंत दोन नागरिक आणि प्राण्यांवर हल्ला करत जखमी केले होते. बिबट्याला पकडण्याठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे भक्ष्याच्या शोधत हा बिबट्या कल्याणच्या नागरी वस्तीत आला. स्थानिकांनी याची माहिती वनविभागाला दिली त्यानंतर वनविभागाने त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. पण अद्याप त्यांन यश आले नव्हते. बिबट्याने इमारतीमधील तीन लोकांवर हल्ला करून इमारतीत प्रवेश केला. इमारतीमधील नागरिकाना बाहेर काढण्यात आलं असून इमारत रिकामी केली असल्याची माहिती वन विभागचे अधिकारी आर. चन्ने यांनी दिली आहे.
नागरिकांच्या आरडा-ओरड्यामुळे श्रीराम अनुग्रह या सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील पॅसेज मध्ये बिबट्याला अडकवून ठेवण्यात आले आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. मात्र शेजारीच हाजीमलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून बिबट्या आला असण्याची शक्यता आहे.