महाराष्ट्रातील मुलींचा संघ राष्ट्रीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत उपविजेता
महिला संघाने महाराष्ट्राची मान उंचावली, अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्याकडून संघातील खेळाडूंचा सत्कार
इस्लामपूर दि १९ (प्रतिनिधी) – आपल्या राज्याच्या मुलींच्या संघाने पश्चिम बंगाल येथील सब ज्युनिअर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उप विजेते पद जिंकून आपली मान उंचावली असून भविष्यात राष्ट्रीय पातळीवर अधिक चमकदार कामगिरी करण्यासाठी राज्यातील मुला-मुलींच्यासाठी सातत्याने प्रशिक्षण शिबीर व स्पर्धा घेणार आहोत,असा विश्वास राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केला.
यावेळी पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या ४५ व्या सब ज्युनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उप विजेत्या महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघातील सर्व महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. मुलींच्या संघाने मिळविलेले यश राज्याची मान उंचावणारे असून या यशात मुलींचे कष्ट,तसेच प्रशिक्षक व पालकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे आहे,अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२३-२४ मधील विविध वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. १४ वर्षाखालील राज्य स्पर्धा भिलवडी (सांगली जिल्हा), १८ वर्षाखालील ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर जिल्हा,२१ वर्षाखालील युथ राज्यस्तरीय स्पर्धा यवतमाळ जिल्हा,वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा चंद्रपूर,वर्धा आणि कोल्हापूर जिल्हा यांनी मागणी केली आहे. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी सचिव स्व. रतन लिगाडे (धुळे),मुंबई विभागाचे विभागीय सचिव स्व.अतुल तावडे (मुंबई), तसेच खासदार स्व.बाळू धनोरकर (वरोरा,जि.चंद्रपूर) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव प्रा.डॉ.संदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसचिव अमोल खोत यांनी आभार मानले. जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पोपट पाटील,राज्य प्रशिक्षक जमीर अत्तार, राष्ट्रीय खेळाडू दर्शन पाटील,आशुतोष अडके,संकेत पाटील,रीतेशकुमार पाटील यांच्या सह राज्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.