महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला! लोकसभेचे जागावाटप निश्चित
भाजपा 'एवढ्या' जागा लढणार, शिंदे व पवार गटाला मिळणार इतक्या जागा, फडणवीसांच्या त्या विधानामुळे शिंदे गटात अस्वस्थता?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आघाडी आणि युतीतील जागावाटपावर चर्चा होत आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असताना आता महायुतीचे देखील जागा वाटप निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा ३ डिसेंबरला लागले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु होईल. पण त्याआधीच महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार भाजपा २६, तर शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) २२ जागा लढविणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती ४० ते ४२ जागांवर विजयी होईल. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. असे फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान या फार्मूलामध्ये शिंदे गट व अजित पवार गट यांना २२ जागा मिळणार आहे. त्यात कोणत्या पक्षाला किती मिळतात यावर महायुतीचे भविष्य अवलंबून आहे. दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या तर वाद नाही. पण, त्यात कमी जास्त झाले तर तो महायुतीत कळीचा मु्द्दा ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुतीचा सर्व्हे नुकताच झाला आहे. भाजपचा वेगळा सर्व्हे राज्यात झाल्या आहे. गेल्यावेळी भाजप २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. सर्व्हेनुसार ज्या ठिकाणी जो पक्ष जिंकून येईल, त्या ठिकाणी त्या पक्षाला संधी दिली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकसभा जागांची अदलाबदली होऊ शकते याचे संकेत दिले आहेत.
नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होईल. अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. २०१९ मध्ये भाजपने २३ जागा जिंकल्या, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २२ जागा आल्या होत्या, त्यापैकी दोन जागा मित्र पक्षासाठी सोडाव्या लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ खासदार निवडून आले होते.