
महायुतीचे राज्यातील जिल्ह्यांचे नवीन पालकमंत्री ठरले?
अजित पवारांचा शिंदे गटानंतर भाजपाला धक्का, महत्वाच्या जिल्ह्यांवर पवार गटाचा ताबा, शिंदे गट अस्वस्थ
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील पालकमंत्र्याच्या आदलाबदली होणार असून त्यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना सुरूवात झाली आहे. पण त्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांचे पालकमंत्रीपद निश्चित करण्यात आले असून याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. अनेक जिल्ह्यांची अदलाबदलीची होणार असून अनेक ठिकाणी नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे.
पुण्याचे पालकमंत्रीपद हा सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या पुण्याचे पालकमंत्रीपद आहे, ते अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले जाऊ शकते.नव्या बदलांनुसार धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद , मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. संजय बनसोडे यांच्याकडे लातूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी, धर्मरावबाबा आत्राम यांना भंडारा-गोंदियाच्या पालकमंत्रीपद आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पालकमंत्रीपद महत्वाचे ठरते. त्यामुळे मोक्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवत अजित पवार गट आपला बळ वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नव्या बदलांत पुण्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारमधील मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा सरकारमधील तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड पालकमंत्री पदावरून शिंदे गट आक्रमक आहे. अशावेळी अजित पवार गटाला तिथले पालकमंत्री पद दिल्यास अस्वस्थता वाढू शकते. तसेच पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपकडून निसटले तर त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.