Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीसाठी महाविकास आघाडी सज्ज

काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा, बैठकीत होणार जागा वाटपावर चर्चा

मुंबई दि २९(प्रतिनिधी)-देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यंनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली.या बैठकीला वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, इंडियाची पहिली बैठक पाटण्यात झाली तर दुसरी बैठक बेंगलुरु येथे नुकतीच पार पडली. या दोन्ही बैठकांना शरद पवार उपस्थित होते. तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केली. मुंबईत होणारी इंडियाची बैठक यशस्वी करण्यावर महाविकास आघाडी म्हणून आमचा सर्वांचा भर आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी मजबूत आहे. पावसामुळे मविआच्या सभा थांबलेल्या आहेत. पावसाळा संपताच या सभा पुन्हा सुरु होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षही राज्यभर सभा घेणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात चार -पाच बैठका घेतलेल्या आहेत. तीन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा होईल तेव्हा जागा वाटप व उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा होईल, असेही नाना पटोले म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!