डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवून उपाययोजना कराव्यात
दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर कामे हाती घेण्याबाबत खासदार सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पुणे दि २२(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग तालुके डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहे. या भागातील धोकादायक दरडी तसेच रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून याबाबत दरवर्षी आपण पत्रव्यवहार करत असतो, अशी आठवणही करून दिली आहे. डोंगराळ भाग, रस्त्यांवरील घाटात, कडेकपारीतील सैल झालेले दगड पावसाळ्यात कोसळून दुर्घटना होतात. तसेच दरडी कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतूक ठप्प होते. या पडलेल्या दरडी वेळच्या वेळी उचलण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात या संदर्भात मी दर वर्षी पावसाळ्यापूर्वी आपणाकडे पत्रव्यवहार करत असते, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
या परिसरात माळीन, इर्शाळवाडी सारख्या दुर्घटना घडू नयेत या दृष्टीने उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच काही घाट रस्त्यांलगत संरक्षक कठड्यांची पडझड होऊ लागली आहे. बहुतांशी ठिकाणी संरक्षक भिंतीची आणि रस्त्यालगतच्या गटारांची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी कोणत्याही क्षणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.