Latest Marathi News

बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला नग्न करत लुटले

आरोपींच्या मारहाणीत पीडित तरुण जखमी, पोलिसांच्या आरोपींना बेड्या

बारामती दि ९(प्रतिनिधी)- बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत त्यास दुचाकीवरून ऊसाच्या शेतात नेत नग्न करून चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर त्याला एटीएम सेंटरमध्ये नेत त्याच्या खात्यातून दोन ट्रान्झेक्शनद्वारे १४५०० रुपये काढल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रविवारी हा विद्यार्थी सुभद्रा माॅल येथे खरेदी करून शासकीय महाविद्यालयाकडे निघाला होता. ऑक्सिजन प्लांट्च्या पूर्वेकडील भिंतीजवळ तो आला असताना एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने त्याला शिविगाळ, दमदाटी करत त्याच्या पॅंन्टच्या खिशातील १५ हजार रुपये मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी फिर्यादीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आणखी एका दुचाकीवरून दोघे आले. त्या तिघांनी या विद्यार्थ्याला शिविगाळ, मारहाण केली. त्यातील एकाने जबरदस्तीने दुचाकीवर मध्यभागी त्याला बसवत त्याच्या पाठीमागे एकजण बसला.ऊसाच्या पिकाजवळ नेली. तिथे या विद्यार्थ्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. शेतातील ऊसाने त्याला मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. दोन्ही हातावर नखाने ओरखडण्यात आले. नग्नावस्थेतील त्याचे फोटो काढून घेण्यात आले. त्यानंतर तु आम्हाला आणखी पैसे दे नाही तर तुझे नग्न फोटो सगळीकडे व्हायरल करू अशी धमकी देत १४,५०० रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्यानंतर त्याला तेथेच सोडून आरोपी एमएच-४२, एएल- ६३६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत संबंधित विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा विद्यार्थी हा सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृहात राहत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. पोलीसांनी या प्रकरणी राहूल धोंडीबा हुगाडे, सुमित किशोर पवार आणि भूषण भास्कर रणसिंग यांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!