
माझा पक्ष भाजपत विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा
एकनाथ शिंदेंचा अमित शहांना प्रस्ताव, शिंदेंच्या दिल्लीवारीचा वृत्तांत समोर, आॅगस्टमध्ये राजकारणात उलथापालथ होणार?
मुंबई – मी माझा पूर्ण पक्ष भाजपत विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर ठेवला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. खासदार राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन आले. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. श्रीकांत शिंदे आणि संजय शिरसाठ यांना आयकर विभागाची नोटीस आल्यामुळे शिंदे यांनी शहांची भेट घेतल्याची चर्चा होत होती. पण आता या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘आपल्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने ते दिल्लीला गेले होते. त्यांनी शहांच्या पायावर डोकं ठेवलं, चाफ्याची फुलं ठेवली. पायाला चंदन लावलं. नंतर ते इतर नेत्यांना भेटले. नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार शाह यांच्याकडे केली. नंतर शिंदेंनी शाह यांना एक ऑफर दिली की, मराठी माणसांची एकजुट तुटली नाही तर आपल्याला धोका होईल. मला मुख्यमंत्री केली तर त्यावर उपाय निघेल. मी मुख्यमंत्री झालो तर या सगळ्या गोष्टी मी थांबवतो. त्यावर अमित शहांनी शिंदेंना सांगितलं की, मुख्यमंत्री तर भाजपचाच होईल. त्यानंतर शिंदेंनी सांगितलं की, मी माझ्यासह संपूर्ण गट भाजपमध्ये विलिन व्हायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. संजय शिरसाठ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ते पैशाची बॅग घेऊन बसल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत. नोटीस मी गांभीर्याने घेत नाही. हा एक इशारा आहे. याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी ऑगस्टच्याअंतापर्यंत घडतील, असे मला संकेत आहेत. त्यामुळेया राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊतांच्या खळबळजनक दाव्यानंतर एकीकडे राजकीय वर्तूळात विविध चर्चांनी जोर धरला आहे. तर, यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिंदे अमित शह यांना भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.