
MH 58 ! महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळाला नवीन पासिंग नंबर
महाराष्ट्रातील पासिंग नंबर ५८ पर्यंत, परिवहन दिवसाचे औचित्य साधत घोषणा, कोणते आहे शहर?
मुंबई – नुकताच परिवहन दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील एका शहराला नवा आरटीओ नंबर देण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहराला नवीन आरटीओ क्रमांक MH58 देण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर शहराला नवा आरटीओ क्रमांक क्रमांक मिळाला आहे. तसेच मिरा-भाईंदर शहरासाठी स्वतंत्र कार्यालय देखील असणार आहे. मिरा-भाईंदर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येथे वाहनांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे लाखो वाहनचालकांना याचा फायदा होणार आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय गुरु शुक्रवारी शासनाने जाहीर केला आहे. एम एच 58 ने मीरा-भाईंदर ची ओळख होणार आहे. २००९ पासून मीरा-भाईंदर शहराचे प्रतिनिधित्व करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उत्तन येथील रहिवाशांकडून अधिक्रहित केलेल्या जमिनीवर हे प्रशस्त कार्यालय उभे राहणार आहे. लवकरच मीरा-भाईंदर येथे दिवाणी न्यायालयाचे इमारतीचे उद्घाटन होणार आहे. भविष्यात पोलीस आयुक्तालय देखील मीरा-भाईंदर साठी निर्माण करण्याचे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. या नवीन उप-आरटीओसह, राज्यातील एकूण उप-आरटीओंची संख्या ३४ वर पोहोचली असून, मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) आता ११ परिवहन कार्यालये झाली आहेत.
मिरा भायंदर भागातील वाहनांची नोंदणी तसेच व्यावसायिक वाहनांसाठी अजूनही ठाण्यालाच जावे लागते. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, पैसा व इंधन वाया जात असल्याने उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती, त्याला आता यश आले आहे.