
५ दिवसांत १०.५ दशलक्ष फॉलोअर्स: देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या एका विधानाचा निषेध म्हणून सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या डिजिटल पक्षाने अवघ्या ५ दिवसांत इन्स्टाग्रामवर १०.५ दशलक्ष (१०५ लाख) फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. या शर्यतीत त्यांनी थेट सत्ताधारी भाजपच्या अधिकृत पेजलाही (८.७ मिलियन) मागे टाकले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा चमत्कार: या आगळ्यावेगळ्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील तरुण अभिजीत दीपके याने केली आहे. अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचे उच्च शिक्षण घेत आहे. देशातील ‘जनरेशन झेड’ आणि २५ वर्षांखालील अशांत तरुणाईकडून या पेजला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

अजब पात्रता आणि जाहीरनामा: या पक्षात सामील होण्यासाठी ‘बेरोजगारी’ आणि ‘आळशी असणे’ अशा अजब पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सत्तेवर आल्यास ‘पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना २० वर्षे बंदी’ आणि ‘महिलांना ५०% आरक्षण’ अशी झणझणीत आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.

सरन्यायाधीशांचे स्पष्टीकरण: सोशल मीडियावरील हा तीव्र उद्रेक पाहून सरन्यायाधीशांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले की, त्यांचे ‘झुरळ’ आणि ‘परजीवी’ हे वक्तव्य सामान्य तरुणांसाठी नव्हते, तर खोट्या पदव्यांच्या आधारे वकिली आणि मीडिया क्षेत्रात घुसलेल्या लोकांसाठी होते. मात्र, तरीही सोशल मीडियावरील ‘CJP’चा हा ट्रेंड थांबायला तयार नाही.

