
संतापजनक! गुलाबी रिबीन पाहून ‘या’ आमदाराची व्यक्तीला मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, लाल रिबीन हवी म्हणत केळीच्या फांदीने व्यक्तीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
आसाम- आमदार हे खरे तर जनतेचे सेवक असतात. पण आजकाल आमदार हे मालक असल्याच्या आविर्भावात वावरताना दिसत आहेत. अनेक आमदारांच्या बेजबाबदार वागण्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यातच आता आणखी एका आमदाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
आसाममधील धुबरी जिल्ह्यातील पूर्व बिलासिपारा विधानसभा मतदारसंघात पुलाचे उद्घाटन करण्यासाठी आमदार समसुल हुदा आले होते. यावेळी पुलाच्या उद्घाटनासाठी केळीच्या दोन खांबाना गुलाबी रिबीन बांधण्यात आली होती. पण गुलाबी रंगाची फीत बघून हुदा संतापले. त्यांनी भूमिपूजनाच्या कामासाठी लाल रंगाची फीत का लावली नाही, असे म्हणत आमदार समसुल हुदा चिडले आणि त्यांनी तिथे असलेल्या एका व्यक्तीला कानाखाली लगावली. एवढेच नाहीतर केळीच्या झाडानेही त्या व्यक्तीला मारहाण केली. विशेष म्हणजे एकानेही त्यांना थांबवले नाही. आमदाराने केलेल्या या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अत्यंत शुल्लक कारणावरून आमदाराने सर्वसामान्य माणसाला मारहाण केल्याबद्दल लोक संताप व्यक्त करत आहेत.
आमदार समसुल हुदा हे एआयडीयूएफ पक्षाचे आमदार आहेत. ही घटना १८ मार्च रोजी घडली आहे. दरम्यान पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर हुदा यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीची माफी मागितली आहे. तरीही नागरिक कारवाईची मागणी करत आहेत.