
मागील पाच वर्षात खासदार नसताना आढळराव पाटील यांनी जमिनीवर राहून गावागावात राज्य शासनाकडून मोठा निधी आणला. सर्वसामान्यांची अनेक कामे मार्गी लावली. विद्यमान खासदारांना गावागावातून लोकांनी निधीसाठी निवेदने दिली; मात्र त्यांनी काहीच कामे केली नाही.
अनेकांना नोकरीला लावतो असे आश्वासन दिले; परंतु त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील एकाही तरुणाला नोकरीला लावले नाही. त्यामुळे फक्त पोपटपंची करणारा नव्हे; तर प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीत धावून येणारे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्याला खासदार म्हणून हवे आहेत, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.
महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जुन्नर तालुक्यात हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, कांदळी, वडगाव, बोरी खुर्द, बोरी बुद्रुक, औरंगपुर अशा अनेक गावांत भेट दिली, वाजतगाजत त्यांचे स्वागत झाले. अनेक ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी आमदार बेनके बोलत होते.
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी या मातीशी आपली नाळ तुटता कामा नये. आणि ते माजी खासदार आढळराव पाटील यांनी जपले आहे. आजही जनतेच्या मनात आढळराव पाटील हेच खासदार आहेत. जनतेची इच्छा यापवेळी नक्की पूर्ण होणार आहे.
मी पक्ष बदलला, पण मी..
माझ्यावर आरोप होतो की, मी पक्ष बदलला, शिवसैनिक म्हणतो मी पक्ष बदलला, पण मी महायुतीत आहे. आढळरावांना निवडून का द्यायचे तर आपल्या गावाला निधी मिळावा. आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी. तुमच्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे आणि यापुढेही राहिल. नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिजन आहे. या भागातील मोठे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर त्यांच्या विचारांचा खासदार शिरूरकरांनी दिला पाहिजे.