Latest Marathi News
Ganesh J GIF

आमदार रोहित पवार यांनी घेतली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

कुकडी व सीना धरणाच्या आवर्तनाबाबत केली महत्त्वाची मागणी, एवढ्या गावांना होणार फायदा

कर्जत दि १६(प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कुकडी डाव्या कालव्यावरती मतदारसंघातील ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. कर्जत तालुक्यात कुकडी व सीना धरणाचे आवर्तन सोडले जात असते या आवर्तनातून उपलब्ध होत असलेल्या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात असून टँकर भरण्यासाठी देखील सध्या पाणी उपलब्ध नाही. याच अनुषंगाने कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी कुकडी व सीना धरणाचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याबाबत मागणी केली होती.

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाल्यास १५ डिसेंबरपासून कुकडीचे आवर्तन सोडण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी बैठकीत ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आवर्तन सोडले जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आता पाऊस झाला नसल्याने ठरल्याप्रमाणे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आवर्तन सोडले जावे याबाबत आमदार रोहित पवार यांनी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे. सध्या पाण्याची मोठी गंभीर परिस्थिती मतदारसंघात शेतकरी व नागरिकांना भेडसावत असल्याने तातडीने कुकडी व सीना धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे हेच लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे आवर्तन सुटावे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून आग्रही मागणी व्हावी याबाबतची विनंती केली आहे. त्याचा फायदा हा जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा,कर्जत तसेच करमाळा या 4 तालुक्यातील गावांना देखील मोठ्या प्रमाणात होणार असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निवारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. याबरोबरच दुष्काळ परिस्थिती पाहता मतदारसंघात पाण्याची व चाऱ्याची देखील मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे याला अनुसरून कर्जत तालुक्यातील 74 गावे व जामखेड तालुक्यातील 75 गावे टंचाईग्रस्त असून पिण्याच्या पाण्याची व जनावरांसाठी चाऱ्यांची आवश्यकता त्या प्रमाणात निर्माण होणार आहे त्यामुळे टँकर व जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो सुरू करण्याची देखील विनंती यावेळी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

शासनाने अनुदानाद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली अनुदानाची रक्कम देखील अद्याप प्राप्त झालेली नाही ती प्रलंबित कांदा अनुदानाची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठीची मागणी देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!