अजित पवार गटाकडून आमदार पत्नी लोकसभा निवडणुक लढणार?
भाजपा खासदार सुजय विखेंचा लोकसभेचा मार्ग खडतर, एैन दिवाळीत राजकीय फटाके फुटणार, विखे पवार वादाचा दुसरा अंक?
अहमदनगर दि १२(प्रतिनिधी)- विखे आणि पवार घराण्याचे राजकीय वैर कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत सुजय विखे काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे सुजय विखे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नातवाच्या हट्टाचे राजकारण चांगलेच रंगले होते. पण आता पुन्हा एकदा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध विखे वादाचा दुसरा अंक रंगण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपाला साथ देत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सत्तेत एकत्र असल्यामुळे विखे पवार वाद शमेल अशी शक्यता होती. पण अजित पवार गटाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर दावा करण्याची तयारी चालू केली आहे. निलेश लंके प्रतिष्ठान आणि लंके परिवाराच्या वतीने येत्या १६ नोव्हेंबर रोजी लंके यांच्या हंगा गावात दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नगर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व सात तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांपासून गावपातळीवरील पदाधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेही मतदारसंघात लंके हे दक्षिणेतील लोकसभेचे उमेदवार असतील व विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी राजकीय गणिते मागील काही दिवसांपासून आखली जात आहेत. त्यामुळे या दिवाळी फराळाकडे राजकीय रणनिती म्हणून पाहिले जात आहे. विखे यांना आव्हान देण्यासाठी आमदार निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण मोहटादेवी मार्गावरील या बॅनरवर आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा फोटो लावण्यात आला होता. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये त्यांचे बॅनर फडकू लागले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आमदार लंके अजित पवार गटात असले तरीही ते शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असतात. म्हणूनच रोहित पवार यांनाही त्यांनी फराळाचे आमंत्रण दिले आहे. निलेश लंके यांचे ‘खास’ व पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पवार यांनी त्यांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाचीही निलेश लंके यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. पण यामुळे सुजय विखे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपाचा विचार केल्यास सुजय विखे यांना आमदार राम शिंदे यांचा विरोध असण्याची शक्यता आहे. अलीकडे राम शिंदे हे सरळसरळ विखे यांच्या विरोधात बोलत आहेत. पण त्यांनी लंके यांच्या मोहटा देवी दर्शन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. अर्थात महायुतीचे जागावाटप अजूनही झाले नसले तरीही अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.