
‘या’ आमदाराच्या पीएची शोरुमच्या मॅनेजरला मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बीडमधील गुन्हेगारीचे सत्र थांबेना, मुंडे धसनंतर हा आमदार अडचणीत
बीड – बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीडचे नाव हे केवळ राज्यात नव्हे तर देशाभरात गाजत आहे. आता बीडमधील आणखी एक आमदाराच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याने मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचबरोबर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे खोक्या भोसलेमुळे आमदार सुरेश धस देखील चांगलेच अडचणीत आले आहेत. आता बीडमधील आणखी एक आमदार वादात अडकले आहेत. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ १२ डिसेंबर २०२४ चा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. यात जयमल्हार बागल यांनी ही मारहाण केल्याचं ही बोलले जात आहे. शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नव्हते, तुम्ही व्हिडीओ बघा…माझा माणूस शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणाऱ्यांपासून वाचवतोय.. ज्या मॅनेजरला मारहाण झाली त्याने तेव्हाच तक्रार करायला हवी होती. या मारहाणीवर त्या शोरूम मॅनेजरची प्रतिक्रिया घ्यायला हवी होती. माझा माणूस जरी असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी होती’, असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांचे व्हिडीओ एकामागून एक समोर आले आहेत. याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा व्हिडिओ पुढे आला आहे. मात्र १२ डिसेंबर २०२४ चा हा कथित व्हिडिओ आताच नेमका कसा व्हायरल झाला? यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. परिणामी या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते आणि नवी कोणती माहिती पुढे येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.