मनसेची लोकसभा निवडणुकीत उडी, मतदारसंघ व उमेदवारही ठरले?
लोकसभा निवडणूकीत मनसेचा स्वबळाचा नारा, मतदारसंघ व उमेदवारांची यादी व्हायरल, कोणाला फायदा कोणाचे नुकसान?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका न लढण्याची घोषणा करत २०१९ साली राज ठाकरेंनी अनेकांना धक्का दिला होता. तसेच अनेक नेत्यांचा हिरमोड देखील झाला होता. पण आता मात्र राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूका लढण्याची घोषणा केली आहे. त्यातच मनसेने उमेदवार सुद्धा निश्चित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.यावर रणनीती तयार करण्यासाठी अहवालही तयार करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या कामाला लागली आहे. एका अहवालानुसार राज ठाकरे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी २० लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे बुधवार २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेणार आहे. लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवार देखील निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे मनसे लोकसभा निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरणार आहे. मनसेने २००९ च्या निवडणुकीत १३ आणि २०१४ च्या निवडणुकीत ११ उमेदवार उभे केले होते. तर २०१९ ची निवडणूक मनसेने लढवली नव्हती. पण त्यांच्या लाव रे तो व्हिडिओच्या सभांची जोरदार चर्चा झाली होती. मनसे लोकसभा निवडणुकीत कोणाचे गणित बिघडवणार आणि कोणाची वाट सुरळीत करणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
मनसेचे संभाव्य उमेदवार
कल्याण- राजू पाटील,
ठाणे- अभिजित पानसे किंवा अविनाश जाधव,
पुणे – वसंत मोरे,
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर,
दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई,
ईशान्य मुंबई- संदीप देशपांडे,
उत्तर मुंबई- अविनाश अभ्यंकर,
उत्तर पश्चिम मुंबई- शालिनी ठाकरे,
नाशिक- डॉ. प्रदीप पवार किंवा दिलीप दातिर,
संभाजीनगर- प्रकाश महाजन,
सोलापूर- दिलीप धोत्रे,
चंद्रपूर- राजू उंबरकर,
रायगड- वैभव खेडकर