Latest Marathi News
Ganesh J GIF

मोदींनी भाकरी फिरवली, या नेत्याला मंत्रीपदावरुन हटवले

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, या मंत्र्यांकडे असणार अतिरिक्त कार्यभार

दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- मागील काही काळापासून न्यायालयाविरोधात सातत्याने वक्तव्य करणारे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून केंद्रीय कायदेमंत्रीपद काढून घेण्यात आलं आहे. अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे केंद्रीय कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यामुळं केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात अनेकवेळा संघर्ष पहायला मिळाला होता.

किरेन रिजिजू यांच्याकडील कायदा मंत्रालयाचा प्रभार अर्जुन राम मेघवाल यांच्या कडे देण्यात आला आहे. अर्जुन मेघवाल हे राजस्थानमधील असून ते प्रशासकीय अधिकारी देखील राहिले आहेत. एकंदरीत किरेन रिजीजू यांना सर्वोच्च न्यायालयासोबत सुरू असलेला वाद भोवला आहे.
किरेन रिजिजू यांना आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.याआधी ते क्रीडामंत्री देखील राहिलेले आहेत. रिजिजू ईशान्य भारतातील भाजपाचे महत्वाचे नेते आहेत. पण त्यांनी काॅलिजिअम पद्धतीवर न्यायालयाच्या विरोधात भुमिका घेतली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला खडे बोल सुनावले होते. रविशंकर प्रसाद यांच्याकडून २०२१ साली रिजीजू यांना हा पदभार देण्यात आला होता. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काही निवृत्त न्यायाधीशांना ‘भारतविरोधी टोळी’चा भाग म्हणून संबोधले होते, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

किरेन रिजिजू यांना हटविण्यामागे सरकारची खराब झालेली प्रतिमा सुधारणे हा हेतू असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्या अलका लांबा यांनी दिली आहे. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे केंद्रीय कायदा मंत्री होईल, असा नेता नाही, अशी बोचरी टीका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!