
नवी मुंबईतील वाशी सेक्टर ११ मधून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि क्षुल्लक गैरसमजातून एका ४२ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आईचा गळा आवळून आणि फरशीवर डोके आपटून निर्घृण खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नक्की काय घडलं?

वाशी सेक्टर ११ मधील जुहूगाव येथील ‘अष्टविनायक सोसायटी’च्या तिसऱ्या मजल्यावरील ३०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये नंदा कदम (वय ६५) या राहतात. त्याच घरात त्यांचा मुलगा महेश कदम (वय ४२), त्याची पत्नी आणि मुलांसह राहत होते. नंदा कदम यांचे घरगुती कारणांवरून त्यांच्या सुनेसोबत नेहमी भांडण होत असे. आई सुनेची (आपल्या पत्नीची) बाजू न घेता नेहमी आपल्या मुलीचीच (बहिणीचीच) बाजू घेते आणि तिचाच संसार पाहत असते, असा संशय आणि राग मुलगा महेशच्या मनात घर करून बसला होता. यावरून मायलेकांमध्ये दररोज बाचाबाची होत होती.

रविवारी सायंकाळी वादाचा भयंकर अंत!
रविवारी सायंकाळीदेखील घरात नेहमीप्रमाणे कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. या वादाच्या भरात महेशचा ताबा सुटला आणि त्याने रागाच्या भरात आपल्या वृद्ध आईचा गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता त्याने आईचे डोके फरशीवर आपटून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
वाशी पोलिसांची धडक कारवाई
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हत्येचा गुन्हा दाखल होताच वाशी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मुलगा महेश कदम याला अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.

