‘दोन महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार’
बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, भाजपासाठी राणे राजकीय दृष्ट्या गरज संपली चर्चेला उधाण
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- नारायण राणेंचं मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचं भाकित वैभव नाईक यांनी केलं आहे.शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी राणे पुत्रांवरही टिका केली आहे.
वैभव नाईक यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा गाैप्यस्फोट केला. ते म्हणाले. “आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे. असा दावा नाईक यांनी केला. यावेळी त्यांनी नितेश राणेंनाही टोला लगावला आहे. “नितेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना आलेल्या ईडी नोटीसीनंतर पक्ष का बदलला हे वडिलांना विचारावं. त्यांनी असं काय कॉम्प्रमाईज केलं की त्यांची चौकशी थांबली हे त्यांनी जनतेला सांगावं. मग इतरांना उपदेश द्यावेत.” अशी टीका वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर केली. या दाव्यानंतर कोकणातील राजकारण तापले आहे. मध्यंतरी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंना नारळ दिला जाणार असल्याची चर्चा रंगली होती.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता. नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याचे मंत्री आहेत. दरम्यान वैभव नाईक यांच्या या विधानावर भाजपकडून किंवा नितेश राणे, निलेश राणे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.