
डोंबिवली दि १७ (प्रतिनिधी)- डोंबीवलीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे एका जीममध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.
कल्याण डोंबिवलीत जुन्या राजकीय वादातूनच जिममध्ये घुसून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. कल्याण डोंबिवलीचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस ब्रह्मा माळी हे आपल्या जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते कुंदन माळी हे अन्य काही कार्यकर्त्यांसोबत जिममध्ये शिरले. जुन्या राजकीय वादातून कुंदन यांनी ब्रह्मा यांना मारहाण केली. ब्रह्मा माळी यांच्या फिर्यादीवरून कुंदन माळी, नितेश सावकार, विनेश माळी आणि मुकेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर कुंदन माळी यांच्या फिर्यादीवरून ब्रह्मा माळी, रमेश पाटील दीलखुश माळी आणि पांडुरंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांना लक्ष्य करणारे ट्विट भाजपाने आज केले आहे. त्यामुळे दोन पक्षातील वाद आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वाद रंगण्याची शक्यता आहे.