राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवले जाणार?
निवडणुक आयोगात या तारखेला होणार सुनावणी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून नवीन चिन्हाचा शोध सुरु
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेणार आहे. पण शिवसेना प्रकरणचा दाखला घेतल्यास राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून नवीन चिन्हाचा शोध घेतला जात आहे.
अजित पवार यांनी २ जुलैला राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. पण एवढचं नाही तर आपणच राष्ट्रवादी असा दावा केला आहे. तर शरद पवार गटाने हा दावा फेटाळून लावत आपणच खरे राष्ट्रवादी असा दावा केला. तसेच दोन्हीजण आपापल्या बाजूने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा वाद निवडणुक आयोगात पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेणार आहे. या सुनावणीदरम्यान राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गटाने नव्या चिन्हांची चाचपणी करण्यास देखील सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे अजित पवार गटाने त्यांच्याकडे विधानसभेतले ५३ पैकी ४३ तर विधानपरिषदेतले ९ पैकी ६ आमदार असल्याचा दावा केलाय. तर, दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. सध्या दोन्ही गटांकडून सुनावणीला सामोर जाण्याची तयारी सुरू असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीपर्यंत अंतिम निर्णय न झाल्यास राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवीन चिन्ह घेऊन निवडणुक लढवावी लागणार आहे. त्याचबरोबर कोणा एकाच्या बाजूने निकाल लागल्यास एक गट या विरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना अधिकृतरित्या फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मूळ चिन्ह धनुष्यबाण सुरुवातीला गोठविले होते. नंतर ते शिंदे गटाला देण्यात आले. दरम्यानच्या काळात ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार ही चिन्हे निवडणूक आयोगाने दिली होती. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे.