‘ती वाघनखे छत्रपतींची नाहीत, असतील तर सरकारने पुरावे द्यावेत’*
इतिहासकारांचा सरकारच्या दाव्यावर आक्षेप, लंडनमधील वाघनखावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी, नक्की वाद काय?
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण ही वाघनखे केवळ तीन वर्षासाठीच आपल्याकडे राहणार आहेत. पण आता याच वाघनखामुळे राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षाबरोबरच काही इतिहासकारांनी वाघनखाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
राज्य सरकार ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबद्दल करार करणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार लंडनला जाणार आहेत. पण अगोदर आदित्य ठाकरे आणि आता इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी वाघनखावर सवाल उपस्थित केले आहेत. वाघनखे शिवकालीन आहे की, महाराजांनी वापरलेली आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून स्पष्टीकरण यावे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. पण आता सावंत यांनी वेगळाच दावा केला आहे. अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होते. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे महाराष्ट्र शासन भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखे नाहीत हे स्पष्ट असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जर लंडनमध्ये असलेली वाघनखे शिवछत्रपतींची असतील तर सरकारने त्याचे पुरावे द्यावेत, असं आव्हान देखील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी दिले आहे. यामुळे सरकारसमोरील अडचणी वाढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच नखांनी अफझल खानचा कोथडा बाहेर काढला होता. हे सरकार सिद्ध करणार की, यावर राजकारण सुरूच राहणार हे पहावे लागणार आहे.
१६ नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहेत. नंतर १७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील. तर १५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. त्यानंतर
१६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ही वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवली जातील.