अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी माहिती विलास लांडे यांनी दिली आहे.
अमोल कोल्हे म्हणतात…
शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी एकूण या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
शरद पवारसाहेबांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी ते घेतील. साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण!, असं अमोल कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भोसरीमध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळाली. शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनर्सवर विलास लांडे भावी खासदार, असं लिहिण्यात आलं होतं. तर या पोस्टरवर संसदेचा फोटोही होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असणार? याची चर्चा होत होती. मात्र आता आज विलास लांडे यांनीच अमोल कोल्हे हे उमेदवार असतील अशा सूचना असल्याचं सांगितलं आहे.
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठक झाली. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित आहेत. तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. शिरूर लोकसभेनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू झाला आहे. स्वतः शरद पवार आज बैठकीत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतं आहेत. संभाव्य उमेदवारांवरतीही बैठकीत चर्चा सुरू आहे