लग्नाच्या सव्वा महिन्यातच पत्नीने केली पतीची निर्घुण हत्या
सासरवाडीतच रचला हत्येचा कट, हत्येचा बनाव पोलीसांकडुन उघड, अंकिता असे का वागली?
पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता मावळ तालुक्यात सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने पतीचा निर्घृणपणे खून केला. पतीला घेऊन माहेरी आलेल्या विवाहितेने त्याला शेतात फिरायला नेले. तिथे झालेल्या किरकोळ वादानंतर बेसावध पतिवर चाकूने वार करत त्याचा खून केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
सुरज काळभोर असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर अंकिता सुरज काळभोर असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज काळभोर याचा दीड ते दोन महिन्यापूर्वी गहुंजे येथील अंकितासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सुरज काळभोर सासरी आले होते. रविवारी सकाळी अंकिताने सुरजला शिरगाव येथे प्रति शिर्डी मंदिरात दर्शनासाठी नेले. तेथून आल्यानंतर तिने सूरजला शेतात फिरायला नेले. तिथे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या अंकिताने सुरज बेसावध असताना त्याच्यावर चाकूने वार करत आणि फावड्याने मारत त्याचा खून केला. अंकिताने केलेल्या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अंकिताने ही हत्या चार ते पाच अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला होता. मात्र तिचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी अंकिताला अटक केली आहे.
पती सुरज काळभोर हा पत्नी अंकिता हिचा शारीरिक शोषण करायचा. घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला होता. त्याला कंटाळून अंकिताने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.