पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने धडक देऊन तिला दहा ते पंधरा फूट फरपटत नेले.
या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सासवड रोड सातवडी या ठिकाणी सकाळी साडेसात ते पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. छाया भाजनदास शिंदे ( वय ४५ रा. डवरीनगर, विशाल नगर, आकाशवाणी, हडपसर ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
काय घडले नेमके?
सासवड रोड सातववाडी येथे प्रशांत सुरसे यांच्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या कडेला छाया शिंदे ह्या रस्ता स्वच्छ करण्याचे काम करीत होत्या. यादरम्यान व्यावसायिक कार जोरात आली आणि तिने सर्वप्रथम फुटपाथला धडक देऊन या महिलेला धडक दिली, महिला समोरच्या चाका खाली अडकल्याने तिला दहा ते पंधरा फूट फरपटत नेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. छाया भाजनदास शिंदे या महिला महापालिकेच्या ठेकेदाराची कर्मचारी म्हणून काम करीत होत्या.